Development is an Art

13 Aug 2007

उजाड भाळ

कोसळली उल्का
पडला खड्डा
दुंभगली धरती
लोकांची आरती
गोष्टी वेल्हाळ

आगीचा लोळ
हल्लकल्लोळ
पसरट विवर
मनाचा सावर
क्षणैक काळ

संपली गाणी
खारट पाणी
अनेक शब्द
तरिही स्तब्ध
उजाड भाळ

किनारा

किनार्‍यास आज आहे तो चंद्र लाजणारा
भरतितूनी माझिया बरसून जाई धारा

ह्या भरतिस माझिया ते आव्हान देई बिंब
उन्मेश मोकळा अन तो लाघवि किनारा

बहर मोगर्‍याचा उन्मुक्त माळला तु
मग रुप तुषारांचे ल्याला माझा शहारा

मी मोती माझ्या तळीचे लेवून साद देतो
गे वाटेत शिंपल्यांचा आहे खडा पहारा

इमले तिरावरीचे वार्‍यास भावले ना
माझिया लाटांवरी मी गे बांधला मनोरा

बहाणे

चेहरा लाल डोळे बंद
अर्ध्या रात्री उमले कळी
काही शब्द पेंगुळलेले
पुरोहिताचे मूक बळी

रात्र दिवस दोन शब्द
ओळख सारखीच मात्र
सुख ओरबाडलं जात
आणि रितंच भिक्षा पात्र

झालाच आवाज कसला
की फक्त वार्‍याचे वहाणे
घेतला जन्म दानवाचा
बाकी फक्त खोटे बहाणे

4 Aug 2007

गौर नार..

गौर नार देखणि
उभी करुनी श्रुन्गार
हाय घरि ना
तिचा अजुनि भर्तार

नजर तिचि स्थिर
नयन पाणिदार
उडे ध्यानी ना
पदर तिचा हिरवागार

कातरवेळ जाहली
सय एकमेव साथिदार
दाटे कंठ कधिचा
नयनि अश्रु अनिवार

रण सम्पले कधिचे
इकडुन वेळ जाहली फ़ार
कुजबुजती कानी कोणी
होता शूर फ़ार सरदार

अखेरीस

ह्या शुभ्र फुलान्च्या ज्वालेला
आहे अन्धाराचि भिती,
पाऊसहि पेटवतो वणवा
ह्या शुष्क सागरावरति

ही इमारत लाल कौलान्चि
पायात कोण मिसळले,
कौले खारी अन दगडान्चि
घर येथेच कोसळले

पाऊस पाणवठयावरति
क्षितिजावर बैरागि फिरतो,
प्रत्येक घाटावरति
अखेरीस कावळा उरतो